
खासदार सुधाकर शृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची प्रमुख उपस्थिती
चाकूर – (प्रतिनिधी) खुर्दळी येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई मंदिरातील घटस्थापनेचा कार्यक्रम रविवार (दि.२५) रोजी कलश यात्रा, आराधी, वाजंत्री यांच्या गजरात खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शेतकऱ्यांच्या सुख, समृद्धीसाठी आराध्यांनी गोधळाच्या माध्यमातून देवीला साकडे घातले.
चंद्रकांत साळुंके यांच्या घरून निघणाऱ्या पालकी (छबिना) मिरवणुकीचा शुभारंभ खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकटराव सोनवणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तर जनमाता देवीच्या मंदिरातील घटस्थापना आमदार बाबासाहेब पाटील, जेष्ठ नागरिक बन्सीलाल कदम, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पोलीस निरीक्षक बालाजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील, अनिल वाडकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत गावकऱ्यांच्या व मानकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.
नवसाला पावणारी आंबामाय अशी सर्वत्र ख्याती असलेल्या देवीची शासनाने दखल घेऊन या मंदिरास तिर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा पंधरा वर्षांपूर्वी बहाल केला आहे. भाविक भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर व परिसराचा विकास व्हावा यासाठी आता ‘ब’ वर्ग दर्जाची आवश्यकता आहे.
देवीची आख्यायिका
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली जनमाता देवी स्वयंभू असून, देवीचे मुळ ठाणे बोधन (जि.निजामाबाद, आंध्रप्रदेश) येथील असल्याची आख्यायिका पिढ्यानुपिढ्या सांगितली जाते. मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र तिर्थ (कल्लोळ) आहेत, तर पश्चिमेस अखंड वाहणारी छोटी नदी आहे. देवीची आख्यायिका भक्त पुढीलप्रमाणे सांगतात. 'पुर्वीच्या काळी दळण-वळणांची साधणे नसल्यामुळे व्यापारी माल वाहतुकीसाठी उंट, घोडे, गाढव, बैल, रेडा आदी पाळीव प्राण्यांचा वापर करत. आंध्रप्रदेशातील माल सोलापूरकडे घेऊन जाताना खुर्दळी येथे नदी किनारी, वृक्षांच्या छायेत व्यापारी मुक्काम करीत असत. असेच एके दिवशी काही व्यापारी उंटावरून तांदळाच्या गोण्या (पोते) घेऊन जाताना खुर्दळी येथे मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी पुढे जाण्यास निघाले असता, उंटाच्या पाठीवर गोण्या ठेवत असताना त्यातील एक गोणी उचलत नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गोणी सोडून तांदूळ बाहेर काढला असता त्यामध्ये सुपारीच्या आकाराएवढी देवीची मुर्ती निघाली. देवीची येथेच राहण्याची ईच्छा असल्याचे समजून व्यापाऱ्यांनी या ठिकाणी देवीच्या (तांदळाई) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली.' सुपारीच्या आकाराची मुर्ती कालांतराने पुढे स्वयंभू वाढत जाऊन मोठी झाल्याचे भाविक भक्त सांगतात.
