नेहरू युवा केंद्राची युवा मंडळ बैठक चाकूर येथे संपन्न
चाकूर : ( प्रतिनिधी) भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या लातूर येथील नेहरू युवा केंद्राच्या वतीने चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात युवक मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला चाकूर, अहमदपूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ येथील युवक मंडळे उपस्थित होती. यावेळी जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, लेखाधिकारी संजय ममदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांची सुरुवात लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य शेषेराव धोंडगे, उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, लेखाधिकारी संजय ममदापुरे, भारत सरकार युवा पुरस्कार विजेते संगमेश्वर जनगावे, पर्यवेक्षक प्रा.ज्ञानोबा हेमनर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेळ साहित्यांचे युवक मंडळांना वितरण करण्यात आले. क्लीन इंडिया मिशन २.० ची सुरुवात भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाबाहेरील परिसराची स्वच्छता करून करण्यात आली. हे स्वच्छ भारत मिशन लातूर जिल्ह्यातील वेगवेगळया गांवात १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी युवकांना मार्गदर्शन करताना स्वयं शिस्त पाळण्याचे आवाहन केले. प्राचार्य शेषेराव धोंडगे यांनी युवकांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, भारत सरकार युवा पुरस्कार विजेते संगमेश्वर जनगावे यांनी युवक मंडळांना मार्गदर्शन केले तर प्रास्ताविकातून लेखाधिकारी संजय ममदापुरे यांनी नेहरू युवा केंद्र लातूर अंतर्गत चालत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. चाकूर तालुका समन्वयक प्रशांत साबणे, अहमदपूर तालुका समन्वयक प्रवीण पवार, माधव ढोबळे, निलंगा तालुका समन्वयक भीमाशंकर, शिरूर अनंतपाळ तालुका समन्वयक रविकांत गुंजेटे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.साळवे यांनी केले तर आभार नामदेव कांबळे यांनी मानले.