Spread the love

पोलीसांचा कृतज्ञता सोहळा संपन्न.

उस्मानाबाद ( दिपक पाटील) शहरातील झाडे गल्ली येथील श्रीमती रेखा बाळासाहेब पवार या पतीसह बाहेर गावी गेल्याने त्यांच्या वयोवृध्द सासू या घरी एकट्या होत्या. रेखा यांची सासू दि. 19.06.2022 रोजी 17.00 ते 18.00 वा. दरम्यान घरास कडी लावून बाहेर गेल्या असता त्यांच्या घराची कडी अज्ञात ईसमाने उघडून घरातील कपाटातले 370 ग्रॅम वजनाचे सुवर्ण (सोने) दागिने चोरुन नेले होते. यावरुन रेखा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 190/2022 हा भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत दि. 20 जून रोजी नोंदवला होता. गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार यांनी घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. त्यानंतर प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी- 1) विक्रांत जगन्नाथ सवाईराम 2) सरोजा विक्रांत सवाईराम या दोघा पती- पत्नींस मुंबई येथील रबाळे रेल्वे स्थानकावरुन दि. 01.07.2022 रोजी अटक करुन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने कसुन व कौशल्यपुर्ण तपासणी केली असता त्या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली जबाब दिल्याने सदर गुन्ह्यातील सुवर्ण ( सोने) दागिने हे त्यांच्या मुळ गावी- शिराळा, ता. वाळवा, जि. सांगली येथील आपल्या घरी ठेवले असल्याचे सांगीतल्याने पथकाने नमूद गुन्ह्यातील चोरीच्या सुवर्ण दागिन्यांपैकी 310 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने आरोपीतांच्या घरातून हस्तगत करुन वरील आरोपींविरुध्द मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. ते जप्त दागिने मा. न्यायालयाच्या आदेशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीमती रेखा बाळासाहेब पवार यांना परत करण्यात आले. आपले दागिने परत मिळाल्याने श्रीमती रेखा बाळासाहेब पवार यांनी व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज दि. 07.10.2022 रोजी पोलीस मुख्यालयात पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, पोलीस उप अधीक्षक श्री. कल्याणजी घेटे यांसह पोलिस निरीक्षक श्री. यशवंत जाधव, श्री. उस्मान शेख, सपोनि- श्री. शैलेश पवार, श्री. बाबासाहेब कांबळे, पोउपनि- श्रीमती आरती जाधव यांसह केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष- श्री. धनाजी आनंदे तसेच अन्य प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात मा. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात चोरी, मारामारी तसेच अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी उस्मानाबाद पोलीस प्रशासनाडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगीतले. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीस आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता असून जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पर्यावणाच्या रक्षणाकरीता पोलीस दलाच्यावतीने 30 हजार वृक्षाचीही लागवड करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!