
हासेगावमध्ये झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांची मंजुरी
लातूर, दि.९ ( प्रतिनिधी) खासदार निधीतील सभागृह बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात आलेली हासेगाव येथील सेवालय प्रकल्पाची २० गुंठे जमीन सेवालयाला परत देण्याचा एकमुखी ठराव ग्रामस्थांनी घेतलेल्या विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मागील सात वर्षांपासून पडून असलेल्या जमिनीवर आता प्रकल्प राबविता येणार आहेत.
एचआयव्ही संक्रमित मुलांसाठी लातूरजवळील हासेगाव येथे सेवालय व हॅप्पी इंडियन व्हिलेज नावाने दोन प्रकल्प सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवी बापटले हे मागील १५ वर्षांपासून यासाठी परिश्रम घेत आहेत. या प्रकल्पात सध्या ८५ लहान मुले व मुली आहेत. त्याचप्रमाणे जन्मतः एचआयव्ही संक्रमित असलेली सहा विवाहित जोडपी येथे राहत आहेत. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी बापटले यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. वरचे वर संक्रमित अनाथ मुलांची संख्या वाढत असल्याने त्यांना सभागृह असावे, अशी अपेक्षा प्रा. बापटले यांनी तत्कालीन खासदार रवींद्र गायकवाड यांच्याकडे व्यक्त केली होती. तत्काळ त्यासाठी गायकवाड यांनी १५ लाख रुपयांचा खासदार निधी जाहीर केला होता. यासाठी संस्थेची जमीन ग्रामपंचायतीच्या नावाने करावी लागते. ती करण्यात आली. परंतु, काही कारणाने सभागृहाचे काम होऊ शकले नाही. त्याच निधीतून सेवालयातील मुलांसाठी वसतिगृह बांधण्यात आले. परंतु, २०१५ मध्ये ग्रामपंचायतीच्या नावाने केलेली जमीन ग्रामपंचायतीकडे तशीच होती. त्या जागेवर आता बापटले यांना विवाहित जोडप्यांसाठी घरकुले बांधावयाची आहेत. त्यासाठी सदर २० गुंठे जमीन सेवालयाच्या नावाने करावयाची होती. ती करण्याची मागणी बापटले यांनी वारंवार केली होती. त्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती.त्यानुसार येथील ग्रामसेवक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयापुढे शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा सर्वांनी मान्यता दिलेले ग्रामस्थ नीलेश आडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आडे यांच्यासमोर ग्रामस्थांसह प्रा. रवी बापटले व वेताळेश्वर बावगे यांनी आपले म्हणणे मांडले. सेवालयाची २० गुंठे जमीन सेवालयाच्या नावे करण्याचे ठरविण्यात आले. सदर जागेची मोजणी करून चतुःसीमा निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेच त्या जमिनीचा आठ अ सेवालयाच्या नावाने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या ग्रामसभेसाठी गावातील ज्येष्ठ नागरिक संग्रामप्पा मुक्ता यांच्यासह भीमाशंकर बावगे, वेताळेश्वर बावगे, जयदेवी बावगे, शिवलिंग जेवळे, शांतेश्वर मुक्ता, सतीश जेवळे, संतोष मानकोसकर, सोमनाथ मदगे, नागनाथ मुक्ता, माणिक मुक्ता, प्रकाश आडे, कमलाकर आडे, लक्ष्मण आडे, गुलाब आडे, रणजित आडे, भाऊसाहेब आडे, विलास आडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
