
काम करताना जो अपमान सहन करतो तोच महात्मा होतो : गहिनीनाथ महाराज
लातूर – ( प्रतिनिधी) समाजात सामाजिक काम करणाऱ्यांना अनेकदा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पाहावयास मिळते. मात्र, समाजप्रिय व्यक्ती – पदाधिकाऱ्यांनी अशा क्षुल्लक बाबींकडे दुर्लक्ष्य करून पुढे चालले पाहिजे. समाजासाठी काम करत असताना जो अपमान सहन करतो तोच पुढे चालून महात्मा, देव होतो असे प्रतिपादन हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.
लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी गहिनीनाथ महाराज अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा मेळावा लातूरच्या खंडोबा गल्लीतील वीरशैव समाज सांस्कृतिक भवनच्या कर्मयोगी मन्मथप्पा बोळेगावकर सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन अहमदपूरच्या वीर मठ संस्थानचे पिठाधिकारी ष . ब्र . १०८ श्री राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव, मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत कोरे, विश्वनाथप्पा निगुडगे, कमलेश पाटणकर, एड. गंगाधरप्पा हामणे, एड. श्रीकांत उटगे, तुकाराम झुकले, पुणे येथील श्रावण जंगम , मेळाव्याचे संयोजक नागेश कानडे, अभिषेक ( तम्मा ) चौंडा, बालाजी पिंपळे, बाबुराव राचट्टे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना हभप. गहिनीनाथ महाराज पुढे म्हणाले की, अशा प्रकारचे वधू – वर परिचय मेळावे ही आता समाजाची गरज बनले आहेत. यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना प्रसंगी समाजाकडून योग्य तो प्रतिसाद , सहकार्य मिळत नाही. तरीही सामाजिक ध्येयाने पछाडलेली मंडळी अनेक अडचणींवर मात करून असे उपक्रम राबविण्याकामी प्रयत्नशील असतात, हे बाब समाजासाठी भूषणावह आहे. समाज जीवनात वावरताना स्वप्नपूर्तीसाठी जीवनाची दिशा निश्चित करणाऱ्या प्रत्येकाला उज्वल यशाची प्राप्ती होत असते. या वधू – वर परिचय मेळाव्यात साधारणतः दोन हजारांपेक्षाही जास्त उप वधू – वरांची नोंदणी झाल्याचे ऐकून आपणास अतिशय आनंद झाल्याचे सांगून गहिनीनाथ महाराजांनी हे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
ष . ब्र . १०८ श्री राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लातुरात होत असलेल्या या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. सामाजिक कार्य करत असताना माणूस असा असावा की, मान – सन्मान दिल्यानंतर त्याला अहंकार नाही आला पाहिजे, तरच ते कार्य, उपक्रम सफल होतात. परमेश्वर नेहमी चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी असतो. आज समाजाला अशा प्रकारच्या मेळावे – उपक्रमांची नितांत गरज आहे. यामुळे विवाह सहजतेने जुळण्याबरोबरच या निमित्ताने का होईना समाज बांधव एकत्रित येऊन सदविचारांची देवाण – घेवाण करतात. ही बाब अशा उपक्रमांच्या माध्यमातून साध्य होते, असेही शिवाचार्यांनी नमूद केले.

यावर्षीच्या मेळाव्याचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना वीरशैव लिंगायत समाज विविध शिवाचार्य महाराजांच्या सुसंस्कारातून घडलेला समाज असल्याचे सांगितले. अशा या संस्कारक्षम वीरशैव लिंगायत समाजाची व्याप्ती देशाच्या प्रत्येक प्रांतात वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. यावर्षीच्या या वधू – वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून जेवढेही विवाह जुळून येतील, ते सर्व विवाह उभय दांपत्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अतूट राहतील, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. समाजात कोणत्याही कारणावरून घटस्फोटाचे प्रमाण वाढू नये यासाठी हा विशेष प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रा. होनराव यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उमाकांत कोरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची पार्श्वभूमी थोडक्यात विशद केली. सामाजिक कार्य करताना येणाऱ्या अडचणींवर परमपूज्य गुरुवर्यांनी योग्य तो तोडगा काढून समाजाला न्याय द्यावा,अशी अपेक्षाही त्यांनी प्रास्तविकात व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश कोऴळे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बसवंतप्पा भरडे , सिद्रामप्पा पोपडे, बंडप्पा जवळे, दगडूआप्पा मिटकरी, लक्ष्मीकांत मंठाळे, सुनील भिमपुरे, सागर मांडे, विवेक जानते,प्रसाद नागुरे ,शिवकुमार महाजन, पंकज कोरे, मन्मथ बोळेगावे, महादेवप्पा लामतुरे, शशी कानडे,आशिष स्वामी, चंद्रशेखर वडजे, बालाजी झिपरे,भानुदास डोके, सौ. शिवगंगा कंगले , सौ. शिवम्माताई संकाये, सौ. भरती अंकलकोटे, श्रीमती सुनंदा उरगुंडे, कैलास इंडे , महेश बिडवे यासह अनेकांनी परिश्रम घेतले .
