Spread the love

धाराशिव शहरातील बॅनरबाजीवर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख साळुंके यांचा हल्लाबोल.

धाराशिव -उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) – दोन दिवसांपूर्वी गार्डन डेव्हलपमेन्ट व आठवडी बाजार नूतनीकरणाच्या कामांना अनुसरून खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरामध्ये काही बॅनर लावलेले आहेत. सदर लावलेले बॅनर हे संपूर्ण धाराशिव शहराची दिशाभूल करण्यासाठी लावलेले आहेत. सदर वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदान सन 2020-21 अंतर्गत ज्या प्रशासकीय कामांना शिंदे-फडणवीस सरकार नगरविकास विभागामार्फत स्थगिती देण्यात आलेली आहे त्या कामाची टक्केवारी खासदार व आमदार यांना आता मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळेच बॅनरबाजी करण्यात येत असल्याचा हल्लाबोल बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला आहे. खासदार, आमदार यांचे दुखणे नेमके कशासाठी? टक्केवारी मिळेना म्हणून की ठेकेदारीसाठी? असा सवालही श्री.साळुंके यांनी उपस्थित केला आहे.

टक्केवारी मिळणार नसल्याच्या धास्तीने खासदार, आमदारांना पोटशूळ उटला आहे. म्हणूनच त्यांची घालमेल सुरु झाली आहे. म्हणूनच राजकीय द्वेषातून  धाराशिव शहरवासीयांची दिशाभूल करण्यासाठी खासदार, आमदारांनी बॅनरबाजीचा उद्योग हाती घेतला आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्यांचे असून येणार्‍या काळात संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब, उमरगा-लोहारा मतदार संघाचे आ. ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विकासनिधी आणून जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी शिंदे सरकार वचनबद्ध आहे. स्थगित केलेले उद्यान नवीनीकरणाचे काम, आठवडी बाजार नूतनीकरणाची कामे नव्याने धाराशिव शहरामध्ये होणार आहेत. धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे सरकार कटिबद्ध असून विकासकामांना विकासनिधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेली आहे.

असे असताना आपल्याला कुठल्याही कामात टक्केवारी मिळणार नाही याची धास्ती खासदार व आमदारांनी घेतली आहे. त्यामुळेच शहरवासीयांची दिशाभूल करण्यासाठी शहरात बॅनरबाजी करण्याचा उद्योग खासदार व आमदारांनी चालवला आहे. परंतु जनता सर्वकाही जाणून आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग बंद करा, असा सल्ला जिल्हाप्रमुख श्री. साळुंके यांनी खासदार व आमदारांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!