
लातूर दि.२३(प्रतिनिधी)- लोकशाहीतील सर्वात महत्वाचा असणारा समतेचा विचार याचा मुळ गाभा संतविचारातून आला आहे. संविधानातील सातही मुलभूत अधिकार याचा संदर्भ संतांच्या प्रत्येक अभंगातून प्रत्ययास येतो असे प्रतिपादन ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.लातूर येथे माजी खासदार डॉ.जनार्धन वाघामारे यांच्या संतचरित्र्य व प्रबोधनात्मक विचारांचाा परामर्श घेणारे संत वाड्मयांवरील शब्दची आमुचे जीवनावचे जीवन या पुस्तक प्रकाशन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गोपाळराव पाटील, लेखक माजी खासदार डॉ.जनार्धन वाघमारे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.रणजीत जाधव, माजी प्राचार्य नागोराव कुंभार, प्रा.डॉ.जयद्रथ जाधव यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.संतांनी केवळ मानवताच सांगीतली नाही तर त्यांनी पशूपक्षी,जनावरे यांच्यासह जडत्वामध्येही देव पाहिलेला आहे. जळी, स्थळी, काष्टी,पाषाणी ईश्वराचे रुप सांगतानाच संतांच्या प्रत्येक विचारात मानवता दिसून येते. या पेक्षा समतेचा दुसरा आदर्श असू शकत नाही असेही त्यांनी सांगीतले. ज्यांच्या अंगी संतत्वाचे गुणही नाहीत त्यांनीजर हा ग्रंथ वाचला तर ते संत झाल्याशिवाय राहणार नाहीत असेही त्यांनी सांगीतले.या प्रसंगी प्रा.डॉ.रणजीत जाधव, माजी प्राचार्य नागोराव कुंभार, प्रा.डॉ.जयद्रथ जाधव, लेखक खासदार डॉ. जनार्धन वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. वाघमारे सरांनी संतांनी ५०० वर्ष महाराष्ट्राला प्रबोधन केले, पुर्वी ग्रामिण भागात कुठल्याही सुविधा नसताना त्यांनी आपले विचार समाजाच्या उध्दारासाठी शब्दरुपात मांडले. तसेच प्रबोधन मागील पाच दशकांपासून डॉ. जनार्धन वाघमारे हे आपल्या लेखनीच्या माध्यमातून करत आहे असे माजी प्राचार्य नागोराव कुंभार यांनी सांगीतले. यावेळी बोलताना लेखक डॉ.जनार्धन वाघामरे यांनी सांगीतले की, संतांनी कधीही कोणाची निंदा केली नाही, शब्दाचा योग्य वापर करत मराठी संस्कृती रुजवण्याचे कार्य केले आहे. या कार्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन करु शकले. संतांनी शब्द दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हाती घेतली. संतांच्या जनजागृती शिवाय हे शक्य नव्हते असेही त्यांनी सांगीतले. आजच्या काळामध्ये विचारांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे शिवाय घटनेनुसार राज्य करताना नैतिकतेची शक्ती गरजेची आहे. अध्यात्यमिक विचाराशिवाय ते शक्य नाही. या काळातच संत विचारांची ज्यास्त गरज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक आणि आर्थीक समानता सांगीतली मी त्यामध्ये अध्यात्माची जोड घातली आहे. याशिवाय लोकशाही रुजली जाणार नाही असेही त्यांनी सांगीतले. अध्यक्षीय समारोपात डॉ. गोपाळराव पाटील यांनी म्हटले की, सोप्या शब्दात समाजप्रबोधन म्हणजे भक्ती मार्गाने केलेले लोकशाहीचे संवर्धन आहे आजच्या ग्लोबल युगात जगण्याचा खरा मार्ग हा संत साहित्याच्या विचारातून येतो असेही त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केले. सुत्रसंचलन विवेक सौताडेकर यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद कांबळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधूकर पाटील, पांडूरंग देडे, गोपाळराव तांदळे, विश्वानाथ होळकुंदे, प्रताप माने, अॅड.वसंतराव उगले, प्रा.अर्जुन जाधव, ज्ञानेश्वर हिंगे, महादेव कांबळे, प्रा.उदय पाटील, बालाजी झाडके, हरिश चव्हाण, दशरथ जाधव यांनी परिश्रम घेतले.
