अणदूरच्या श्री खंडोबा देवस्थान समितीचे सचिव सुनील ढेपे यांचा पलटवार
उस्मानाबाद -( प्रतिनिधी) जे खंडोबा देवाचे कधीच दर्शन घेत नाहीत, यात्रा – उत्सवात सहभागी होत नाहीत, त्यांनी मंदिर समितीवर चिखलफेक करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असा पलटवार अणदूरच्या श्री खंडोबा देवस्थान समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिरात दि. २१ ऑगस्ट रोजी दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाली, त्यानंतर दोन्ही गटांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले, नंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते, त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केल्यानंतर जामीन मिळाला आहे.
या हाणामारीचे भांडवल करून जे खंडोबा देवाचे कधीच दर्शन घेत नाहीत, यात्रा – उत्सवात सहभागी होत नाहीत ते अरविंद घोडके, राजेंद्र स्वामी, राजेश देवसिंगकर यांनी वाद अधिक चिघळावला आहे. ज्यांच्याबरोबर भांडण झाले ते राहिले बाजूला आणि यावरून राजकारण सुरु झाले आहे. भांडणाचे निमित्त करून देवस्थान समितीला बदनाम करण्याचा कुटील डाव सुरु आहे.
या भांडणांशी श्री खंडोबा देवस्थान समितीचा अर्थाअर्थी संबंध नसताना, श्री खंडोबा देवस्थान कमिटी बरखास्त करा, देवस्थानची जमीन वाटून द्या, आदी मागण्या हे त्रिकुट करीत आहेत, या मागण्या हासास्पद आहेत, देवस्थान समितीचा कारभार अत्यंत पारदर्शक असून, बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. देवस्थानमध्ये गैरव्यवहार केल्याचे सिद्ध केल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असे प्रति आव्हान ढेपे यांनी दिले आहे.
देवस्थान समितीचे सर्व सदस्य मानधन घेत नाहीत, बैठक भत्ता घेत नाहीत, केवळ सेवाभावी वृत्तीने काम करतात, मंदिरात दोन पूर्णवेळ कर्मचारी असून एक सुरक्षारक्षक आणि एक सफाई कर्मचारी आहे. कोरोना लॉकडाऊन काळात दोन वर्षात एक रुपयाचे उत्पन्न नसताना, कसे भागवले हे कोणी विचारले नाही. पण भाविकांनी आजवर दिलेल्या चांदीतुन ६१ किलो चांदीचे मखर केल्यापासून काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. देवस्थान ताब्यात घेऊन त्यात मलिदा खाण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे.
दोन समाजात तेढ निर्माण करून गावातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अरविंद घोडके, राजेंद्र स्वामी, राजेश देवसिंगकर यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी गुरव समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
