
– 72 तासांत पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा.
निलंगा (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय वेगाने तपास करून आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा उलगडा केला आहे.दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी रामलिंग मुदगड शिवारात एका शेताच्या बांधावर गुलाब विलास खरोसे (वय 34 वर्षे) हा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मारहाण झालेली तसेच गळा आवळल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. याबाबत त्यांचे वडील विलास राम खरोसे (वय 70 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कासार सिरसी येथे गु.र.न. 30/2026 कलम 103(1) BNS प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे सूचने व मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण,
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ढुमे, पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी घटनास्थळी भेट देत तपासास दिशा दिली.
पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास, स्थानिक चौकशी तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. सदर खुनाचे तपासात स्थानिक पातळीवरून कोणत्याही प्रकारची मदत अथवा माहिती मिळत नव्हती. नमूद खुणाबाबत मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना विचारपूस केली असता कुटुंबीयांनी जाणीवपूर्वक तपासात सहकार्य न करता टाळाटाळ करून त्यांच्याकडून जाणून-बुजून माहिती लपविण्यात येत असल्याची शंका येत होती.तरीपण पोलिसांनी कसोशीने कौशल्यपूर्वक सर्व परिस्थिती काळजीपूर्वक हाताळत तपास करून तपासादरम्यान मिळवलेल्या महत्त्वाच्या पुराव्यावरून संशयाची दिशा मयताच्या सख्ख्या भावाकडे वळली. त्यानुसार उल्हास विलास खरोसे (वय 32 वर्षे, रा. रामलिंग मुदगड) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुंतागुंतीच्या तपासात 03 दिवस सातत्याने केलेल्या प्रयत्नाला पोलिसांना यश प्राप्त झाले.
चौकशीत असे निष्पन्न झाले की, आरोपी व मयत यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून व कौटुंबिक वादातून सतत भांडणे होत होती. या वादाचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी शेतातून परत येत असलेल्या त्याच्या भावावर हल्ला करून त्याचा खून केला.आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन कासार सिरसी येथे हजर करण्यात आले आहे. नमूद आरोपीला मा.न्यायालयाने 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण राठोड करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ढुमे (निलंगा) यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलापटटे, नवनाथ हासबे, संजय कांबळे, राजेश कंचे, युवराज गिरी, पाराजी पुठेवाड , डावरगावे , श्रीनिवास जांभळे,संतोष खांडेकर, व्यंकटेश निटुरे यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येत राहील.
संशयित आरोपी उल्लास विलास खरोशे

