Spread the love

लातूर (प्रतिनीधी ) : लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे भुईसमुद्रगा (ता.लातुर) येथे दि.19 डिसेंबर,2021 रोजी रात्री इसम नामे ऋषीकेश रामकिशन पवार (वय 29 वर्ष) यांच्या शेतातील आखाडयामध्ये जळुन मयत झाल्याची घटने वरुन पो.स्टे.ला अ.म.नं. 284/2021 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता .सदरच्या घटनास्थळाला अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी भेट दिली, मयत हा घटनेच्या दिवशी कोणा कोणा सोबत होता या दृष्टीनेच पोलीसांनी अत्यंत बारकाईने तपास केला . त्याबाबत कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळुन आला नाही. मयत हा आगीमध्ये जळून खाक झाल्याने सदरचा खुन किंवा अपघात याबाबत तर्कवितर्क चर्चा ग्रामस्थामध्ये होती. एमआयडीसी पोलीसांनी अत्यंत संयमाने व तांत्रिक दृष्या तपास करुन पुरावे गोळा केले व प्राप्त गोपनिय माहितीचे संकलन करुन तसेच सीसीटीव्ही फुटेज , मोबाईल चॅटींग, मोबाईल लोकेशन, कॉल्स या बाजुने बारकाईने तपास करुन सदरचा मयत ऋषीकेश रामकिशन पवार वय 29 याचा खुन झाल्याचा उलगडा झाला. दि .19 डिसेंबर,2021 रोजी मयत ऋषीकेश रामकिशन पवार याचे शेतातील आखाडयावर गावातील त्याचा मेहुणा रणजीत विजयकुमार देशमुख व चुलत भाऊ गोविंद नागोराव पवार हे दारु पिऊन मटनाचे जेवण केल्यानंतर आरोपी गोविंद पवार यांने मयत ऋषीकेश यास तु लई माजलास का ? तु माझे भावजयीला मोबाईलवर का बोलतोस ? असे म्हणुन वादावादी करुन आरोपी गोविंद नागोराव पवार याने आखाड्यावरील दाताळाने (शेती अवजार) मयताचे डोक्यात मारले. मयत ऋषीकेश हा बेशुध्द पडल्यानंतर त्यास गोविंद पवार व रणजित देशमुख यांने बाजेवर झोपवुन त्यावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले व पायी घराकडे गेले. असे सदर गुन्हयातील आरोपीने कबुली जबाब दिलेला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोहेकॉ भिमराव बेल्लाळे, पोना अर्जुन राजपुत , पोना प्रशांत ओगले, पोना दरेकर , पोना विष्णू वायगावकर , पोना मालवदे , पोशि जाधव यांनी अत्यंत गोपनीय तपास करुन व माहिती काढून गुन्हा उघडकीस आणला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!