Spread the love

माहितीच्या अधिकारात माहिती मागवून तिचा दुरुपयोग करायचा

लातूर ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 18/07/ 2022 रोजी एका तक्रारदाराने पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे येऊन तक्रार दिली की, ते लातूर येथील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरीवर आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत लातूरतील विविध प्रशासकीय विभागास वाहनाचा पुरवठा करण्यात येतो. त्यांनी विविध विभागांना 22 गाड्या गाड्यांचा ड्रायव्हर व डिझेलसह पुरवठा केला आहे. काही दिवसापासून माधव सूर्यवंशी नावाच्या इसमाने माहिती अधिकारात संबंधित विभागाकडून माहिती मागून घेऊन मला व आमच्या मालकांना “तुम्ही गाड्यांचे किलोमीटर, रनिंग कमी जास्त करता. तुम्ही जीएसटी भरत नाहीत. तुमच्या गाड्यांची सर्व माहिती मी माहिती अधिकारात मागून घेतलेली आहे. मी तुमची बिल निघू देणार नाही. तुमच्या गाड्या चालू देणार नाही.तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना जीवानिशी ठार मारू,आमची गॅंग तुम्हाला जगू देणार नाही” अशी धमकी देऊन दोन लाख रुपये खंडणीची मागणी करीत आहेत अशी तक्रार पोलीस ठाण्यास दिली. पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जितेंद्र जगदाळे तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक श्री. दिलीप डोलारे , सहायक पोलीस निरीक्षक दयानंद कदम, पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस अमलदारांचे पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना सूचना व मार्गदर्शन केले. माधव सूर्यवंशी याने तक्रारदारास खंडणीची रक्कम घेऊन जिल्हा परिषद लातूर येथील आवारात बोलविल्याने दिनांक 18/07/2022 रोजी संध्याकाळी 4 वाजण्याचे सुमारास पथकाने पंचासहित जिल्हा परिषदच्या आवारात सापळा लावला. थोड्याच वेळात तक्रारदाराकडून खंडणीची रक्कम घेत असताना माधव सूर्यवंशी व त्याचा सहकारी सचिन आकनगिरे यांना खंडणीच्या रकमेसह जिल्हा परिषद च्या आवारातील रजिस्ट्री ऑफिस समोरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून खंडणी म्हणून घेतलेली रक्कम जप्त करण्यात आली असून या सर्व घटनेची रेकॉर्डिंग करण्यात आलेली आहे. नमूद प्रकरणातील तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे 1) माधव आबाजी सूर्यवंशी, वय 36 वर्ष, व्यवसाय माहिती अधिकार कार्यकर्ता, राहणार स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, एलआयसी कॉलनी, लातूर. 2) सचिन उर्फ गोवर्धन चंद्रकांत आकनगिरे, वय 36 वर्ष, व्यवसाय ग्राहक सेवा केंद्र, राहणार स्वराज्य नगर, लातूर. यांचे विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 320/2022 कलम 384,385, 386, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या गुन्ह्यात दिनांक 19/07/2022 रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास नमूद आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. नमूद अटक आरोपीकडे तपास केला असता त्यांच्याकडे माहितीच्या अधिकारात मागवून घेतलेल्या अनेक संचिका मिळाल्या असून त्यांनी आणखीन काही लोकांकडून खंडणी उकळल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे असल्यास संबंधितांनी पुढे यावे व शिवाजीनगर पोलीस स्टेशन अथवा लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात आपली तक्रार नोंदवावी. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!