
लातूर ( प्रतिनिधी) देशिकेंद्र विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम घेतले जात आहेत.या उपक्रमाचा भाग म्हणून शनिवार(दि.१३)रोजी साडेनऊच्या सुमारास जनजागृती फेरी काढण्यात आली.या फेरीत विद्यार्थ्यांनी देशातील विविध राज्यातील लोकांच्या वेशभूषा साकारून एकात्मतेचा संदेश दिला. शिवाय, चित्ररथावर आरुढ झालेल्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य लढ्यातील अनेक सेनानींच्या व्यक्तीरेखा साकारुन त्यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगी झेंडे तर तोंडी देशभक्तीपर घोषणा होत्या. या घोषणांनी परिसर निनादून गेला होता.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही फेरी काढण्यात आली .या फेरीची श्री. देशिकेंद्र विद्यालयातून सुरुवात झाली व शिवाजी चौकातून टाऊन हॉल व तेथून शाळेकडे अशी काढण्यात आली.या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गात व भारतमातेचा जयघोष करत परिसर निनादून सोडला .ही फेरी पाहण्यासाठी लातूरकरांनी मोठी गर्दी केली होती.या वेळी या फेरीत मराठी, काश्मिरी, राजस्थानी, कर्नाटकी,तामिळी,हरियाणवी,आसामी,बंगाली तसेच इतर राज्यांतील लोकांच्या वेशभूषा साकारल्या . या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी भारतातील विविधतेचे दर्शन घडवत लातूरकरांंना एकात्मतेचा संदेश ही दिला. टाऊन हॉल येथे तीनशे विद्यार्थ्यांनींनी साकारलेला भारताचा तिरंगी नकाशा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.या फेरीतील विद्यार्थ्यांंचे नेतृत्व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी केले.
तत्पूर्वी, सकाळी मुख्याध्यापक रुपसिंग सगर यांच्या हस्ते व संस्थेचे सहसचिव विजयकुमार रेवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.तर साडेनऊ च्या सुमारास श्री. देशिकेंद्र विद्यालयात महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील-टाकळीकर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर तसेच श्री देशिकेंद्र महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करुन अभिवादन केले तसेच तिरंगी रंगांचे फुगे आकाशात सोडून फेरीस हिरवा कंदिल दाखविला. यावेळी संस्थेचे सहसचिव विजयकुमार रेवडकर, कोषाध्यक्ष ऍड.गंगाधर कोदळे, संचालक बस्वराज येरटे,कायदेशीर सल्लागार ऍड.शांतवीर चौधरी यांच्यासह स्वप्नील रेवडकर, मुख्याध्यापक रूपसिंग सगर,उपमुख्यध्यापक बसलिंग भुजबळ, पर्यवेक्षक दयानंद रामपूरे, शिवानंद स्वामी,मनोज दानाई,पुष्पा पाटील,वर्षा सांडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
