स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे चाकूर यांची संयुक्त कारवाई.
चाकूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/08/2022 ते 24/08/2022 चे दरम्यान मध्यरात्री मौजे नळेगाव येथील फिर्यादीचे राहते घराचा दरवाजा उघडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. वगैरे तक्रारी अर्जावरून पोलीस ठाणे चाकूर येथे दिनांक 24/08/2022 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 304/2022 कलम 457,380 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते,सदर संयुक्त पोलीस पथकाने गुन्ह्या उघडकीस आणण्याच्या दिशेने गुन्हेगारांची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे
1) संदिपान निवृत्ती कांबळे, राहणार नळेगाव तालुका चाकूर.
यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भाने विचारपूस केली तेव्हा नमूद आरोपीने सदरचा घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरलेला 3 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल सोन्या-चांदीचे दागिने हजर केल्याने ते गुन्ह्यात जप्त करण्यात आले असून दिनांक 26/08/2022 रोजी नमूद गुन्ह्यात संदिपान कांबळे यास अटक करण्यात आलेली आहे.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे चाकूर यांचे संयुक्त पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अवघ्या दोनच दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांचे नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील, पोलिस अंमलदार सुनील घोडके, सुग्रीव मुंडे, सूर्यकांत कोळेकर ,नागरगोजे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, लातूर चे सफौ संजु भोसले, पोलिस अमलदार राम गवारे, सुधीर कोळसुरे, बंटी गायकवाड, सिद्धेश्वर जाधव यांनी पार पाडली.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील हे करीत आहेत.
