चाकूर :- (प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 25/08/2022 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांच्याकडे एका तक्रारदाराने माहिती दिली की, “काही महिला व पुरुष त्याला कमी दरात दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते लोक माझी फसवणूक करतील याबद्दल मला संशय निर्माण झाला असून सदरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार आजच संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.”अशी माहिती दिली. त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांनी चाकूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून माहिती मधील ठिकाणी सापळा लावण्यात आला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोन्याची देवाण घेवाण होत असताना पोलिसांचा संशय आल्याने सदरच्या टोळीतील सदस्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला दबा देऊन बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्याच्या जवळ असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिवळ्या धातूचे दागिने सापडले. पोलिसांनी टोळीतील सदस्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, “आम्हाला पैशाची गरज असल्याने आम्ही हे सोने कमी किमतीत विकायचे आहे” असे सांगत ग्राहकाला खोटे सोने विकणार होतो. अशी कबुली दिली. त्यावरून नमूद टोळीतील सदस्य नामे 1)जया दीपक शिंदे, वय 35 वर्ष, राहणार विठ्ठल नगर, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.2) शीला तपास भोसले, वय 37 वर्ष, राहणार विठ्ठल नगर, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.3)शुक्सला समाधान काळे, व 39 वर्ष, राहणार मोतीहरा तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.4) राम मारुती कोकरे, वय 26 वर्ष, राहणार कोरेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.5) सुरज समाधान काळे, 21 वर्ष, राहणार कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.6) सुनील सिताराम भोसले,61 वर्ष राहणार मोतीझरा गल्ली, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. यांचे विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे दिनांक 26/08/2022 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 307/2022, कलम 420,511,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात नमूद आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडील बनावट सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चाकुर पोलीस करीत आहेत. बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या आणखीन टोळ्या सक्रीय असल्याची शक्यता नाकारता येत नसून सदरच्या टोळ्या मधील सदस्य प्रथमता खरे सोन्याचे दागिने दाखवून खरेदी-विक्रीचा व्यवहार फिक्स करतात.जेव्हा ग्राहक आमिषाला बळी पडून स्वस्तात सोने घेण्यासाठी येतो तेव्हा घाई गडबड करून किंवा पोलीस आल्याचा बनाव करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करतात व घाई गडबडीत बनावट सोने देऊन पैसे घेऊन पळून जातात प्रसंगी ग्राहकास मारहाण सुद्धा करतात. त्यामुळे नागरिकांनी स्वस्तात सोने मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडू नये. असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व त्यांच्या पथकातील पोलिसांनी केली आहे.
