Spread the love

जिल्हाधिकारी डॉ.सचिनओम्बासे

तुळजापूर,दि.13 (कुलजीत खंडेरीया):- तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीजींचे मंदिर हे भारतातील साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे. या ठिकाणी संपूर्ण देशभरातून भाविक मोठ्या भक्तीभावाने लाखोंच्या संख्येने येथे येत असतात. पर्यायाने दर्शनासाठी भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात होत असते. अशा ठिकाणी भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच श्री तुळजाभवानी देवस्थानचा विकास हा श्री तिरुपती बालाजी देवस्‍थानच्या धर्तीवर करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव-2022 च्या संवाद व आभार प्रदर्शनाच्या तुळजापूर येथील श्रीनाथ लॉन्स मंगल कार्यालयातील कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.ओम्बासे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उपविभागीय पोलिस अधीक्षक सई भोरे-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थान अधिकारी वृषाली तेल्लोरे, तहसीलदार सौदागर तांदळे, पोलिस निरीक्षक श्री.काशीद,नगरपरिषद चे मुख्याधिकारी, तिन्ही मंडळांचे महंत व पुजारी, माजी नगराध्यक्ष धीरज पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशातील अनेक प्रांतातून भाविक शारदीय नवरात्र महोत्सवास येत असतात. त्यावेळी त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रथमोपचार, राहण्याची, जेवणाची, स्वच्छता गृह आदींच्या सोयी आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहण्याऐवजी भाविकांना दर्शनाचे ऑनलाईन स्लॉट्स उपलब्ध करुन दिले तर भाविकांचा वेळ आणि त्रासही कमी होण्यास मदत होईल. यासाठी तुळजाभवानी देवस्थानचा विकास हा तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, असेही यावेळी श्री.डॉ.ओम्बासे म्हणाले. डॉ.ओम्बासे यांनी शारदीय नवरात्र महोत्सव-2022 च्या नियोजनाचे देखील कौतुक केले. यावेळी मंदिर प्रशासन आणि महसूल व पोलिस अधिकाऱ्यांबरोबर आरोग्य विभाग, नगर परिषद, महावितरण विभाग तसेच प्रसार माध्यमांतील कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!