लातूर (दिपक पाटील) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांनी निर्बंध लावले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तरी अनेक ठिकाणी अद्यापही थोडया जास्त प्रमाणात निर्बंध आहेत. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे नियमांमध्ये बदल होत असल्याने अवैध धंद्यांवरही वचक बसला होता. वाहन तपासणीसाठी जागोजागी चेकिंग पॉइंट उभारण्यात आल्याने अवैध दारू, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात मदत होत होती परंतु रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने अवैध धंदेवाले पुन्हा डोके वर काढतांना दिसत आहेत. अशातच लातूरमध्ये अर्धा किलो गांजा पकडण्यात लातूर शहराचे पोलीस उपाधीक्षक यांचे विशेष पथक व गांधी चौक पोलीसांना यश आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपीला गांजा ऍक्टिवा गाडीच्या डिक्कीत ठेवून वाहतूक करताना रंगेहात पोलीसांनी पकडले आहे.
लातूर शहराचे पोलीस उपाधीक्षक यांच्या विशेष पथकाला ऍक्टिवा वाहनांमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सदरील माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,पोलीस उपाधीक्षक (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वातील पथकाने महात्मा बसेश्वर महाविद्यालयांसमोरील बालाजी मंदिर ते उस्मानपुरा रोडवर फेमस फोटो स्टुडिओ समोर गोपनीयमाहितीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सापळा लावून थांबले असता दि.२८/०९/२०२१ रोजी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी नामे ज्ञानोबा गणपती उपाडे, वय ५८ वर्षे, रा. पळशी ता. रेणापूर जि. लातूर याने त्याच्या ताब्यातील दुचाकी ऍक्टिवा क्रं. एम एच २४ बी एच २९२० चे डिक्कीमध्ये बी मिश्रित गांजा वजन ५४४ ग्रॅम असलेला अंदाजे किंमत ५५४०/- रुपये व ऍक्टिवा दुचाकी क्रं. एम एच २४ बी एच २९२० जुनी वापरती अंदाजे किंमत ८०,०००/- रुपये किंमतीचा असा एकूण ८५५४०/- रु. किंमतीचा बेकायदेशीररित्या बाळगून घेऊन जात असताना आढळून आला याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून पोलीसांनी आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सदरील कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस उपाधीक्षक (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वात विशेष पथकातील स.पो.उप.नि. वहीद शेख, स.पो.उप.नि. रामचंद्र ढगे, पोना महेश पारडे, पोना अभिमन्यू सोनटक्के पोलीस ठाणे गांधी चौक, लातूर येथील पोलीस उपनिरीक्षक कोहाळे, परी. पीएसआय संदीप अन्येबोईनवाड, गुन्हे प्रगटीकरन शाखेचे पोह युसूफ शेख,पोना दत्तात्रय शिंदे, पोना शिवाजी पाटील, पोना ज्ञानेश्वर दत्तनगिरे, पोना धनंजय गुट्टे यांच्या पथकाने केली. पुढील अधिक तपास सपोनि प्रशांत लोंढे करत आहेत.
