
लातूर : ( प्रतिनिधी ) रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांना विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री झाली असून यास पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी दुजोरा दिला आहे.
कार्यालयीन कामात अनियमितता आणि सिरसाट यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्या विरोधात मागील अनेक दिवसांपासून तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यातच रेणापूर परिसरातील एका तक्रारीचा आधार घेत एकावर अवैधरित्या आवश्यक नसलेली कलमे लावून सिरसाठ यांनी गुन्हा दाखल केला होता.
तक्रार कर्त्याच्या तक्रारीनुसार , सिरसाठ यांनी आधी पैशांची मागणी केली परंतू , पैसे न दिल्यामुळे त्यांनी संबंधितावर सुड बुध्दीने अवैधरित्या कलम लावून गुन्हा दाखल केला. तसेच , जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती .
याबाबत संबंधितांनी पुराव्यासह पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात चौकशी अंती सिरसाठ दोषी असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात यावे, अशी शिफारस पोलीस अधिक्षकांकडून पोलीस उपमहानिरिक्षक यांच्याकडे पाठविण्यात आली होती. मागील दोन दिवसांपासून नांदेड येथील विशेष पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी हे लातूर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी वाजता तांबोळी यांनी सोपान सिरसाठ यांच्या निलंबनाचे आदेश काढले . सिरसाठ यांच्या निलंबनामुळे रिक्त झालेल्या रेणापूर पोलीस ठाण्याचा पदभार सहायक पोलीस निरिक्षक श्रीराम माचेवाड यांच्याकडे देण्यात आला आहे .
