पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते झाला सत्कार
लातूर ( प्रतिनिधी) विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या बीसीए द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल येणे बाकी आहे. तोपर्यंतच येथील कॉक्सिट महाविद्यालयाच्या अमन मुलानी या विद्यार्थ्याची ‘एचएमएक्स मीडिया’ या नामांकित आयटी कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व त्यांच्या पत्नी समध्दी पिंगळे यांच्या हस्ते त्याचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. कैलास जाधव, विभागप्रमुख प्रा. संभाजी देशमुख, डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. ईश्वर पाटील, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. गणेश पवार, महाविद्यालयाचे अधीक्षक संतोष कांबळे उपस्थित होते.
द्वितीय वर्षातच नामांकित आयटी कंपनीत थेट नोकरी मिळविणारा अमन हा कॉक्सिट महाविद्यालयातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. सुरुवातीलाच त्याचे वार्षिक पॅकेजही तीन लाख ६० हजार रुपये असणार आहे.
कॉक्सिट महाविद्यालयाने नोकरी देणारे संगणकशास्त्राचे शिक्षण मागील २२ वर्षांपूर्वी सुरू केले. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकर्या मिळाल्या आहेत. गेल्यावर्षी तृतीय वर्षातील ३८३ विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण होण्यापूर्वीच नामांकित २६ आयटी कंपन्यांमध्ये नोकर्या मिळाल्या. कंपन्यांना आवश्यक असलेले शिक्षण महाविद्यालयातच देण्यात येते. यासाठी स्वतंत्र ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. यातच विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येते. त्याप्रमाणे विप्रो कंपनीने आवश्यक असलेला अभ्यासक्रम कॉक्सिटमध्ये दिला आहे. यासाठी विप्रोने दोन प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले आहे. यामुळे दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकर्या मिळत आहेत. या तयारीमुळेच बीसीए द्वितीय वर्षाची परीक्षा दिलेला अमन बहादूर मुलानी याची ‘एचएमएक्स मीडिया’ या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. त्याला ३ लाख ६० हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्याची अपेक्षा जास्त असल्याने तो मोठ्या पगाराच्या प्रतीक्षेत आहे.
द्वितीय वर्षाची परीक्षा देवून अद्याप निकाल येणे बाकी असतानाच नोकरी मिळविणारा अमन हा कॉक्सिटचा पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशाबद्दल त्याचा व पालक मुलानी यांचा निखिल पिंगळे व समृध्दी पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
