
लातूर ( दिपक पाटील) : विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी भातागंळी पाटी येथे गुरुवार (ता.२६) साडे अकराच्या सुमारास एका आरोपीस लातूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले आहेत.या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे., लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की,भातांगळी येथून एक इसम एम एच १२ एफ एन १९०५ क्रमांकांच्या दुचाकीवर कमरेला गावठी कट्टा लावून भातांगळी पाटी मार्गे लातूरला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सदरील माहिती वरिष्ठाना कळवली. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले , माधव लोणेकर,सहायक पोलिस उपनिरीक्षक पांढरे, विठ्ठल शेवाळे, गजानन टारपे ,विनोद लखनगिरे, महिला पोलीस राजकन्या नागरगोजे, चालक चंद्रकांत केंद्रे यांचे पथक रवाना झाले.सदर पथक ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत भातांगळी पाटी येथे थांबले असता बातमीतील मिळालेल्या क्रमांकांच्या दुचाकीवरून एक इसम जाताना आढळला. त्याला थांबवून पंचासमक्ष त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याचे नाव व गाव प्रकाश रामकिशन बेंबडे रा. भातांगळी असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी कट्टा,२ मॅगझीन, ६ जिवंत काडतूस विनापरवाना बाळगत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व १३५ म.पो.का.प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
