वर्धा, दि. 5 : शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी कृषी विभागाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. कृषी क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष्यभिमुख कामे करावी व शेतकरी हिताच्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज कृषी विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाच्या योजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते.
श्रीमती देशभ्रतार म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना कृषी विभागाव्दारे योजना राबविण्यात येतात. परंतू, योजने अंतर्गत जिल्ह्याला प्राप्त लक्षांक विहित मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे योजनेची फलश्रुती होत नाही. यामुळे कृषी विभागाच्या प्रत्येक घटकाने योजने अंतर्गत असलेले लक्ष्यपूर्तीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे.
त्या पुढे म्हणाल्या की, रब्बी व खरिप या दोन्ही हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाण्यांची कमतरता भासू नये म्हणून ग्राम स्तरावर सीड बँक निर्मितीचे अचूक नियोजन करण्यात यावे. ग्राम कृषि विकास समिती स्थापनेच्या कामाला गती देण्यात यावी. पीएम किसान योजना व पीक कापणी प्रयोग नियोजन अंतर्गत प्राप्त लक्षांक पूर्ण करण्यासाठी जबाबदारीपूर्वक कामे करावी. अपघातग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मोबदला मिळण्यासाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करुन संबंधितांचे मोबदला मिळण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावे. फळबाग लागवड कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभ देण्यासाठी मजूरांचे सर्व मस्टर पूर्ण करुन रोजगार उपलब्ध करुन द्यावे. गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजने अंतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, करडई, जवस आदी कडधान्य पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात यावे. पोकरा योजनेचे काम गतीने पूर्ण करुन लक्षांकपूर्ती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या.
बैठकीत सिंचन नियोजन, आरएडी योजना, पीएम किसान योजना, सोयाबीन बियाणे उपलब्धता, खरीप पीक कापणी प्रयोग, अतिवृष्टीमुळे पीक नुकसान, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, मृदसंधारणची कामे, गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम आदी संदर्भात जिल्ह्याची प्रगती व लक्षांकपूर्ती संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. #DSPNEWS
