
कोव्हिड मुक्त जगासाठी देवीला आराध्यांचे साकडे
लातूर :{ प्रतिनिधी }- खुर्दळी (ता.चाकूर) येथे बुधवार (दि.६) रोजी जनमाता (तांदळाई) देवी मंदिरात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानकऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी कोव्हिड मुक्त जगासाठी आराध्यांनी गोधळाच्या माध्यमातून देवीला साकडे घातले. पालकी मिरवणूक, जलयात्रा व नगर प्रदक्षणा काढून परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली.
चाकूर या तालुक्याच्या ठिकाणापासून पश्चिमेस सहा किलोमीटर अंतरावर… नऊशे ते हजार उंबरठ्यांचे खुर्दळी हे गाव…या गावाची शासनाच्या काही विभागात खुर्दळी तर काही विभागात हाळी (खुर्द) अशी नोंद…गावाच्या उत्तरेला बालाघाट डोंगररांगेच्या कुशीत…नदी किनारी…वृक्षांच्या छायेत…निसर्गरम्य परिसरात पुर्वाभिमुख असलेली…जगनमाता देवी…”भक्तांच्या नवसाला पावणारी, जनमाता देवी…” म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.
जनमाता देवी स्वयंभू असून, देवीचे मुळ ठाणे बोधन (जि.निजामाबाद, आंध्रप्रदेश) येथील असल्याची आख्यायिका पिढ्यानुपिढ्या सांगितली जाते. मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र तिर्थ (कल्लोळ) आहेत, तर पश्चिमेस अखंड वाहणारी छोटी नदी आहे. देवीची आख्यायिका भक्त पुढीलप्रमाणे सांगतात. ‘पुर्वीच्या काळी दळण-वळणांची साधणे नसल्यामुळे व्यापारी माल वाहतुकीसाठी उंट, घोडे, गाढव, बैल, रेडा आदी पाळीव प्राण्यांचा वापर करत. आंध्रप्रदेशातील माल सोलापूरकडे घेऊन जाताना खुर्दळी येथे नदी किनारी, वृक्षांच्या छायेत व्यापारी मुक्काम करीत असत. असेच एके दिवशी काही व्यापारी उंटावरून तांदळाच्या गोण्या (पोते) घेऊन जाताना खुर्दळी येथे मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी पुढे जाण्यास निघाले असता, उंटाच्या पाठीवर गोण्या ठेवत असताना त्यातील एक गोणी उचलत नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गोणी सोडून तांदूळ बाहेर काढला असता त्यामध्ये सुपारीच्या आकाराएवढी देवीची मुर्ती निघाली. देवीची येथेच राहण्याची ईच्छा असल्याचे समजून व्यापाऱ्यांनी या ठिकाणी देवीच्या (तांदळाई) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली.’ सुपारीच्या आकाराची मुर्ती कालांतराने पुढे स्वयंभू वाढत जाऊन मोठी झाल्याचे भाविक-भक्त सांगतात.
पुर्वी देवीचे हेमाडपंथी मंदिर होते. परंतु, कालांतराने ते मोडकळीला आल्याने काही वर्षापूर्वी गावकऱ्यांनी देवीचे मुळ स्थान न बदलता मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्यानंतर शासकीय निकषांनुसार धर्मादाय आयुक्तांकडे ‘जनमाता आई देवस्थान विश्वस्त मंडळ’ या नावाने न्यास नोंदणी केली. नवसाला पावणारी आंबामाय अशी सर्वत्र ख्याती असलेल्या देवीची शासनाने दखल घेऊन या मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे. तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट रस्ता व भक्त निवासाचे काम झाले आहे. गावकऱ्यांनी यशवंत ग्रामसमृध्दी योजनेच्या माध्यमातून मोठा सभामंडप बांधला आहे. पाणी, वीज, अत्याधुनिक भक्त निवास अशा विविध सोयी सुविधा येथे उपलब्ध आहेत. दर वर्षी साजरा केले जाणारे नवरात्री उस्तव या वर्षी साजरे करण्यात येणार आहेत.
