शिरूर अनंतपाळ 🙁 प्रतिनिधी) जिल्हया सह तालुक्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी . या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीद्वारे दि. २२ नोव्हेंबर २०२१ पासून ‘जुनी पेन्शन संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.
राज्यातील सर्व आस्थापनांवरील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन ( डी सी पी एस ) योजना लागू आहे. या योजनेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून होणारी कपात व शासनाचे अंशदान याच्या हिशोबाबाबत आजमितीला प्रचंड अनागोंदी असून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे दुर्दैवी निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबास कोणत्याही प्रकारची शाश्वत मदत मिळत नसल्यामुळे या योजनेबाबत सर्व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सदरील योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ ची कुटुंब निवृत्तीवेतन योजना (जुनी पेन्शन) लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या ६० पेक्षा अधिक संघटनाची वज्रमुठ बांधून जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीद्वारे दि. २२ नोव्हेंबर २०२१ पासून मुंबई येथील आझाद मैदान येथून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. सदरील यात्रा राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १८ दिवसांचा प्रवास करून दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी सेवाग्राम वर्धा येथे होणार आहे.
या संघर्ष यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे अन्यायकारक अशा नवीन पेन्शन योजनेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करणे, जुनी पेन्शन अभावी सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था याबाबत शासनाला व लोकप्रतिनिधी यांना अवगत करणे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा लढा तीव्र करणे हा आहे.
तरी लातूर जिल्ह्यातील सर्व आस्थपनांमधील नवीन पेन्शन योजनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भक्ती-शक्ती मंगल कार्यालय पी व्ही आर चौक ते खाडगाव रोड रिंग रोड लातूर येथे सहभागी होऊन हा लढा अधिक तीव्र करावा असे आवाहन जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचे प्रा. डॉ.अमोल लाटे यांनी प्रसिद्धी पत्रिके व्दारे आव्हान केले आहे.
