अंबाजोगाई : {प्रतिनिधी }लातूर-अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्गावर बर्दापूर जवळील सायगाव नजीकच्या नंदगोपाल डेअरी जवळ ट्रक आणि एस. टी. बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ९ रोजी सकाळी ८.३० वाजता घडली.अंबाजोगाई तालुक्यातील सायगावनजीक सकाळी एम. एच. २० बी. एल. ३०१७ औरंगाबाद आगाराची बस लातूरहुन अंबाजोगाई मार्गे औरंगाबादकडे व ट्रक क्रमांक के. ए. ५ ई ५४९४ ही अंबाजोगाईहून लातूरकडे जात असताना वाटेत धुके पडल्याने नंदगोपाल डेअरी जवळ असलेल्या खडी केंद्रानजिक बस-ट्रकची जोराची धडक बसल्याने बस मधील ४ प्रवाशी ठार तर १४ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये २० प्रवासी प्रवास करत होते. त्यात वाहकासह इतर ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले असुन जखमीना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे तातडीने दाखल करण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करुन जखमींना बाहेर काढावे लागले जखमीवर उपचार सुरु आहेत.या भीषण अपघातात आदिल सलीम शेख वय २९ रा. अंबाजोगाई, चंद्रशेखर मधुकर पाटील ( वाहक ) वय ३९ रा. कांचनवाडी औरंगाबाद, नलिनी मुकुंदराव देशमुख वय ७२ रा. ज्योतीनगर औरंगाबाद व सादेक पटेल वय ५५ वर्ष रॉकी नगर मशिदजवळ लातूर या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुंदरराव ज्ञानोबा थोरात वय ५०,राहणार पांगळी ता. धारुर, हरिनाथ रंगनाथ चव्हाण वय ६७ रा. लातूर, असमत अतिम पठाण ३८ वर्ष लातूर, जियान फतीमा पठाण वय १० लातूर, अलादीन अमीर पठाण वय २० निलंगा, योगिता भागवत कदम वय ४० वर्षे लातुर, भागवत निवृत्ती कांबळे ५५ लातूर, संगीता बजरंग जोगदंड वय ४४ वर्षे लातुर, दस्तगीर आयुब पठाण वय १९ वर्षे निलंगा, सुभाष भगवान गायकवाड ४३ वर्षे पिंपळगाव , आयान पठाण १३ वर्ष लातुर, माधव नरसिंग पठारे ६५ जालना, बळीराम संभाजी कराड वय २२वर्ष रा.खोडवा सावरगाव, प्रकाश जनार्दन ठाकूर वय ५५ वर्षे हे १४ प्रवासी जखमी झाले आहेत,या अपघातानंतर हा संपूर्ण रस्ता बराच वेळ जाम झाला होता. मात्र, काही वेळाने अपघातग्रस्त बस क्रेनच्या साह्याने हटविण्यात आली. ज्यानंतर येथील सगळी वाहतूक ही पूर्ववत झाली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, तहसीलदार विपीन पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यासह अंबाजोगाईचे आगार प्रमुख नवनाथ चौरे, यांच्यासह सायगाव, बर्दापुर येथील ग्रामस्थानी धाव घेवुन मदत कार्य केले.
