Spread the love

कृषीपंपधारकांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी उरले केवळ अडीच महिने
लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्हयातून 9325 शेतकरी झाले एकरक्कमी बिल भरुन थकबाकीमुक्त
• परिमंडलात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद, 166 कोटीचा कृषी आकस्मिक निधी उपलब्ध
• कृषी आकस्मिक निधीतून स्थानिक पातळीवर वीज विकास कामाला वेग
• जिथं अधिकची कृषी वीजबिल वसूली तिथेच अधिक वीज विकासाची कामे सुरु
दोन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा 136 कोटी रुपये भरुन योजनेत सहभाग

लातूर { प्रतिनिधी } :- महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी ऊर्जा धोरण- 2020 अंतर्गत लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्हयातून 9325 शेतकरी एकरक्कमी वीजबिल भरुन थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांना महावितरणतर्फे थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्रही देवून सन्मानीत करण्यात आले आहे. 9325 शेतकऱ्यांनी 26.07 कोटी रुपयांचा भरणा केलेला आहे. या धोरणांतर्गंत पन्नास टक्क्याच्या सवलतीचा लाभ मार्च 2022 पर्यंतच घेता येणार आहे. अनेक सार्वजनिक सुटटयांसह केवळ 75 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. शेतीपंपधारकांनी सवलतीचा लाभ घेत वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी शक्य तितक्या लवकर आपले वीजबिल भरुन अखंडित वीज पुरवठयाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यानी केले आहे.

    कृषीपंप ऊर्जा धोरण-2020 या सवलतीच्या धोरणात मार्च 2022 पर्यंत चालू वीजबिलांसह सुधारित थकबाकीमधील केवळ पन्नास टक्के रक्कमेचा भरणा केल्यानंतर उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे भरलेल्या पन्नास टक्के रक्कमेतून आकस्मिक निधी उभारण्यात येवून त्यातून ग्रामपंचायत पातळीवर 33 टक्के व जिल्हा पातळीवरुन 33 टक्के असे एकूण 66 टक्के रक्कमेची शेतशिवरात विजेची पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहेत. शिवाय, उर्वरित 34 टक्के रक्कम राज्यस्तरावरुन वीजेच्या खर्चासाठी वापरण्यात येत आहे. अर्थात, शेतकऱ्यांच्या वीजबिलापोटी भरण्यात आलेल्या संपूर्ण रक्कमेचा खर्च शेतकऱ्यांसाठीच करण्यात येणारी ही योजना आहे. शिवाय, ती शेतकऱ्यांना भरघोस सवलत देणारी आहे. या भरघोस सवलतीच्या योजनेत मार्च 2022 पर्यंतच भाग घेता येणार आहे. लातूर परिमंडलात शेतकऱ्यांचा या योजनेस चांगला प्रतिसाद असून भरलेल्या वीजबिलातून 166 कोटीचा कृषी आकस्मिक निधी जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या धोरणांतर्गंत वसूल झालेल्या वीज महसूलातून 33 टक्के रक्कमेचा ग्रामपंचायत सतरावर एक कृषी आकस्मिक निधी उभारण्यात आला असून त्याअंतर्गंत विदयुत वितरण रोहित्रांची उभारणी, रोहित्रांची क्षमतावाढ, उच्च आणि लघुदाब वीज वाहिन्या व कृषीपंप जोडण्यांची कामे करण्यात येत आहेत. तर दुसरा निधी जिल्हा स्तरावरील कृषी आकस्मिक निधी असून त्याअंतर्गंत विजेची 33/11 केव्ही उपकेंद्रांची उभारणी आणि अतिरिक्त पावर ट्रान्सफॉर्मरची कामे करण्यात येत आहेत. तिसरा कृषी आकस्मिक निधी राज्यस्तरावरील असून तो 34 टक्के रक्कमेचा आहे. तोही ऊर्जाविषयक कामावर खर्च करण्यात येत आहे.

जिथं अधिकची कृषी वीजबिल वसूली तिथेच अधिक वीज विकासाची कामे सुरु करण्यात येत असल्याने लातूर परिमंडलात या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिमंडलात आक्टोबर 2020 पासून म्हणजे योजना सुरु झाल्यापासून 9325 शेतकऱ्यांनी एकरक्कमी 26.07 कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. लातूर जिल्हयातून 3703 शेतकऱ्यांनी 11.07 कोटी, बीड जिल्हयातून 2866 शेतकऱ्यांनी 6.90 कोटी तर उस्मानाबाद जिल्हयातून 2756 शेतकऱ्यांनी 8.09 कोटी रुपयांचा एकरक्कमी भरणा केला. त्याना थकबाकी मुक्तीची प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत.

तर योजनेत ठरवून दिलेल्या हप्त्याप्रमाणे वीजबिल भरुन सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांनी नियमितपणे सर्व हप्ते भरल्यानंतरच योजनेच्या थकबाकीमुक्तीचा लाभ त्यांना मिळणार आहे. हप्त्याने बिल भरुन सहभाग नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लातूर जिल्हयातून 55440 इतकी असून त्यांनी 41.80 कोटी, बीड- 85202 शेतकऱ्यांनी 61 कोटी तर उस्मानाबाद जिल्हयातून 60633 शेतकऱ्यांनी 33.33 कोटी रुपयांचा कृषी वीजबिल भरणा केला. परिमंडलात एकूण 2 लाख 1275 शेतकऱ्यांनी 136.13 कोटी रुपये भरले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेवून थकबाकीमुक्त व्हावे. असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!