Spread the love

लातूर 🙁 प्रतिनिधी) चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग शिक्षिका श्रीमती नंदा ईराप्पा नरहरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे दिला जाणारा ‘सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
श्रीमती नरहरे यांना ७८ टक्के शारीरिक अपंगत्व आहे. या अपंगत्वावर मात करत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्यांची दखल पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिपक चामे, रंगनाथ सगर, रविराज देशमुख, जयराज सोदले यांनी घेतली. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे दिला जाणारा ‘सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२’ जाहीर झाला आहे. या निवडीचे पत्र गट शिक्षण अधिकारी संजय आलमाले, तालुक्यातील केंद्र प्रमुख, रविराज देशमुख, जयराज सोदले यांच्या हस्ते देण्यात आले. या पुरस्काराचे वितरण अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, पुणे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार (दि.१५ मे २०२२) रोजी सकाळी ९ वाजता केले जाणार आहे.
यापूर्वी श्रीमती नंदा नरहरे यांना माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते रोटरी क्लब च्या वतीने दिला जाणारा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’, माजी राज्यमंत्री तथा तत्कालीन आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते नेहरू युवा मंडळाचा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार तर आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पंचायत समितीच्या वतीने दिला जाणारा ‘तालुका स्तरीय गुरुगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ‘सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शिक्षक पॅनल हा राज्यभरातील पंचेविस हजार तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षकांचा समूह आहे. या समूहामार्फत दरवर्षी सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे विध्यर्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या, लॉकडाउन काळात ऑनलाईन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणाऱ्या तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात पाऊलखुणा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वाना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!