
लातूर, दि.14(दिपक पाटील):- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मांजरा परिवाराच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय कारणास्तव उभा करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प हा लातूर जिल्हयालाच नव्हे तर गरज भासल्यास मराठवाडयातील सर्व जिल्हयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
विलास नगर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात मांजरा परिवाराच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ऑक्सिनज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन व शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते.
या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृती शुगर अँन्ड अलाईड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश उटगे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, राज्यात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मांजरा परिवाराच्या संयुक्त विद्यमाने विकास रत्न विलासरावा देशमुख मांजरा सहाकारी साखर कारखाना विलास नगर येथे वैद्यकीय उपयोगासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हा लातूर जिल्हयात नव्हे तर गरज भासल्यास मराठवाडयातील सर्व जिल्हयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणार असून या मांजरा परिवाराने या प्रकल्पाचे भूमीपूजन 26 मे 2021 रोजी करुन आज रोजी माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्या 9 व्या स्मृती दिनानिमित्त लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला याचा आनंद होत आहे. अल्पकालावधीत हा सर्वोत्कृष्ठ प्रकल्प उभा झाला आहे. हा ऑक्सिजन प्रकल्प सहभाग योजनेअंतर्गत उभा केला असून या प्रकल्पास सहभाग नोंदविलेल्या सर्व पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी, कामगार वर्गाचे आभार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख म्हणाले की, मांजरा परिवाराच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्पाचा संकल्प केला व अल्पकालावधीतच आज रोजी त्याचे लोकार्पण झाले. मांजरा परिवार या ऑक्सिजन प्रकल्पातील निर्मिती झालेले ऑक्सिजन सिलेंडर प्रशासनामार्फत ना नफा ना तोटा तत्वावर वितरीत केले जाणार आहे. असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाला मशनरी पुरवठा करणारे राहूल इगे व सौ.इगे यांचा मांजरा परिवाराच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्या 9 व्या स्मृती दिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास मांजरा परीवारातील सहाकारी साखर कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, सभासद,कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावीक मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश उटगे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक श्री.रणवरे यांनी मानले.
