
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने निर्माण होत असलेले हे वस्तीगृह म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख यांच्या सामाजिक कार्याची आठवण
कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी सहकार विभागाची सहा एकर जागा मिळवण्याचा प्रयत्न
सहकार विभागाच्या कायद्यात बदल करून वस्तीगृह व इतर सुविधा निर्माण करण्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांना परवानगी असावी
गुळ मार्केट येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाच्या कामाचे भूमिपूजन
लातूर, दि.14(प्रतिनिधी) :- उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर च्या वतीने गुळ मार्केट येथे निर्माण करण्यात येत असलेले मुलींचे वस्तीगृह बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुली व इतर गरजू मुलींसाठी आहे. या वस्तीगृहांमध्ये मुलींच्या दृष्टीने सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुली व इतर गरजू मुलींचा शिक्षणासाठी लातूर शहरात राहण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले.उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने मुलींचे वसतिगृह भूमिपूजन समारंभ प्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सभापती ललीतकुमार शहा, उपसभापती मनोज पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, वेंकट बेंद्रे, श्रीशैल्य उटगे, किरण जाधव व सचिव भगवान दुधाटे आदी उपस्थित होते.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने निर्माण होत असलेले हे वस्तीगृह म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख यांच्या सामाजिक कार्याची आठवण आहे. अशा कामातून सर्वसामान्य लोकांचे हित जोपासले जाऊन त्यांच्या विकासासाठी मदत होते असे सांगून पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील निवडणुकांमध्ये दिलेल्या वचनाची पूर्ती म्हणजे हे वस्तीगृह आहे.उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी बाजार समितीच्या लगत असलेली सहकार विभागाची सहा एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बाजार समिती विविध सामाजिक उपक्रम राबवित असून या उपक्रमाच्या विस्तारासाठी ही जागा उपयोगी ठरेल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत गुळ मार्केट येथे होत असलेले मुलींच्या वसतिगृहाचे हे काम चांगले असून यामुळे मुलींच्या शिक्षणाची सोय होणार आहे या ठिकाणी वस्तीग्रह अभ्यासिका व इतर अनुषंगिक उपक्रम राबविला जाणार आहेत. यामुळे हे काम अधिक गतीने पूर्ण करावे, असे आवाहन दिलीपराव देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. राज्यातील बाजार समितीने शेतकऱ्यांच्या निवासा बरोबरच वस्तीगृह व इतर अनुषंगिक उपक्रम राबवण्यासाठी सहकार कायद्यात बदल करावा. त्यामुळे ज्या बाजार समितीची आर्थिक क्षमता आहे असा बाजार समित्यांमार्फत शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी वसतिगृह, अभ्यासिका निर्माण करणे सोयीचे होईल व त्यातून शेतकऱ्यांच्या मुलांना अधिक मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असे श्री. दिलीपराव देशमुख यांनी सूचित केले .प्रारंभी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लोकनेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या 9 व्या स्मूर्ती दिन निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती ललित कुमार शहा यांनी केले व बाजार समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली तर कार्यक्रमाचे आभार उपसभापती मनोज पाटील यांनी मानले.

