
अभिवादन कार्यक्रमास उसळला अलोट गर्दीचा महासागर.
लातूर (प्रतिनिधी) दि. ०६.१२.२०२२ नवभारताचे कोहिनूर, विश्वरत्न, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, बहुजनांचे कैवारी, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मुक्तिदाते महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ०६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. या महापरिनिर्वाणामुळे भारतीय बहुजनांचा प्राणवायू निघून गेला. या दुःखदायी घटनेत आज ६६ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानानिमित्त समस्त लातूरकरांच्यावतीने सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला याला अलोट गर्दीचा महासागर उसळला. लातूर जिल्ह्यातील बौद्ध उपासक-उपासिका आणि समस्त लातूरकर पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्वप्रथम बौद्ध धम्म संस्कार चॅरीटेबल ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भिक्खू संघाच्यावतीने विनम्रपणे अभिवादन करून सर्वांना त्रिसरण पंचशील देण्यात आले. यानंतर सामूहिक महाबुद्ध वंदना, बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना घेण्यात आली. तसेच डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा उपस्थितांकडून वदवून घेतल्या. यावेळी भिक्खू पय्यानंद थेरो, भिक्खू महाविरो थेरो, भिक्खू सुमेध नागसेन, भिक्खू विनयशील, भिक्खू इंदवंस आणि भिक्खू बुद्धशील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व भंतेजींचे लहान बालकांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, समाजकल्याण लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकूर्ते, समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्यासह लातुरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला रात्री १२ वा. कॅण्डल (मेणबत्ती)द्वारे बाबासाहेबांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आणि आज महाबुद्ध वंदनेला येताना प्रत्येकाने एक पेन आणि एक वही आणली ती सुद्धा समाजातील गरजू विद्यार्थ्यांना लवकरच देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

