चार मुले, दोन मुले अपंग, एक मुलगी विधवा तर एका मुलीला तिचा नवरा नांदवत नाही.
तावशी येथील तेजाबाई कांबळे यांचे संघर्षमय जिवन
औसा :- { विलास } औसा तालुक्यातील तावशी या गावांत तेजाबाई लिंबराज कांबळे एक मागासवर्गीय कुटुंबातील महिला आपल्या चार मुलाना सोबत घेऊन राहते. लींबाजी आंबाजी कांबळे यांचे पाच वर्षापूर्वी निधन झाले सतत दारू पिण्याची सवय होती. लींबाजी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व चार मुलांचे पालन पोषण बँडमध्ये वाजंत्री वाजवुन व मजुरीने पती पत्नी जाऊन आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. अचानक निधन झाल्याने सर्व संसाराची जबाबदारी तेजाबाई कांबळे यांच्या खांद्यावर येऊन ठेपली. पहिला मुलगा लक्ष्मण लींबाजी कांबळे हा 32 वर्षाचा आहे. पाचवी पर्यंत त्याची प्रकृती चांगली होती अचानक अपंगत्व आले. दुसरा मुलगा मेसा लींबाजी कांबळे हा 28 वर्षाचा असून वयाच्या नवव्या वर्षी अपंग झाला. त्यांची पहिली मुलगी मनीषा हिचा विवाह कोल्हापूर येथील अनिल लोंढे यांच्याशी 2003 मध्ये झाला. पण दुर्दैवाने 2014 मध्ये ह्रदय विकारांच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कोल्हापूर येथे उदरनिर्वाह भागत नसल्याने त्या आपल्या एका मुलीला घेऊन माहेरी तावशी येथे राहायला आल्या. दुसरी मुलगी अनिता लींबाजी कांबळे यांचा विवाह चिंचोली काजळे येथील मुलासोबत झाला होता पती नांदवत नसल्याने त्यासुद्धा रहायला माहेरी आल्या. त्यांना रोहण नावाचा 15 वर्षाचा एक मुलगा आहे. अक्षरशः त्यालाही अचानक अपंगत्व आले आहे. त्यांच्या दोन्ही मुली घराच्या शेजारी राहतात व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. तेजाबाई कांबळे या दोन अपंग मुलाना घेऊन मोलमजुरी करून त्यांचा सांभाळ करतात.
नेहमीच म्हणतात ना की, गरिबी काय असते त्या कुटुंबाकडे पाहून बघावे. ना रहायला घर, छोट्याश्या तीन पत्र्याच्या खोलीमधे ते कुटुंब राहतं. जेंव्हा हाताला काम मिळते तेंव्हा त्यांना खायला मिळते. गेल्या पंचवीस वर्षापासुन तेजाबाई कांबळे यांचे कुटुंबाची दैनिय अवस्था झाली आहे. कधी उपाशी तर कधी तापाशी राहून दिवस काढत आहेत. तेजाबाई कांबळे व त्यांची मुलगी मनीषा लोंढे याना विधवा परित्यक्ता यातून पगार चालू झाली आहे. मोठा मुलगा लक्ष्मण कांबळे याना ही अपंगांची पगार चालू आहे.
पगारीवर थोडाफार घर प्रपंचा भागतो. तर लहान मुलगा मेसा लींबाजी कांबळे व अनिता कांबळे यांचा मुलगा रोहण कांबळे या तिघांना ही पगार सुरू झाली तर खरच या कुटुंबाला आर्थिक मदत होईल. अनेक वेळा पगारीचे कागदपत्रे केले तरीसुद्धा शासन दरबारी मंजूर झाले नाही ही मोठी खंत आहे. 2 मुले अपंग एक मुलगी विधवा तर एक मुलगी पतीने सोडल्यामुळे माहेरी राहते. पन्नास वर्षीय तेजाबाई कांबळे याना अनेक गोष्टीना सामोरे जावे लागत आहे. आपल्या मुलाबाळांचा सांभाळ कसा करावा अशी चिंता नेहमीच तिच्या मनात राहते. एखाद्या सामाजिक संस्थेने हे कुटुंब दत्तक घेऊन पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. अनेक राजकीय मंडळींनी या कुटुंबाकडे सहानुभूतीने बघण्याची गरज आहे. अत्यंत गरिबी व दारिद्र्यात हे कुटुंब आपले जिवन जगत आहे. अनेक सेवाभावी संस्थेने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. अनेक मागासवर्गीय संघटनेने सुद्धा या कुटुंबा विषयी जनजागृती करून समाजातील एक घर मागे पडत आहे. त्यांना पुढे आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
