
शिरूर अनंतपाळ (अजीम ) :- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील शेतक-यांची अज्ञात इसमाने सोयाबीन पिकांची बणीम जाळल्याने अंदाजे तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची तक्रार येथील शेतकरी सोपान माधवराव माळी यांनी शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयात केलेली आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी साकोळ शिवारातील सर्वे नंबर 264/265 मधील अंदाजे चार ते पाच एकर शेतीमधील सोयाबीन काढून सोपान माधवराव माळी यांनी आपल्या शेतात पिकांची बणीम लावली होती.परंतू अज्ञात व्यक्तीने ती बणीम जळाल्यामुळे माळी यांचे 3 ते 4 लाखाचे नुकसान झाल्यामुळे माळी यांच्यावर सणासुदीच्या दिवसात उपासमारीची वेळ आलेली आहे.
त्यांच्यावर आगोदरच सावकारांचे कर्ज असताना पुन्हा मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे माळी यांनी नुकसानीची तक्रार शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जटाळे तसेच पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांना एका लेखी निवेदनाव्दारे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी केलेली आहे.
