Spread the love

लातूर, दि.5 (प्रतिनिधी):- गेल्या काही वर्षामध्ये जमीनीच्या किंमती प्रचंड वाढल्या असून मोठया प्रमाणात जमीनीचे तुकडे करुन त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू असतानादेखील तसे व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दस्त नोंदणीतील अनियमितता टाळण्यासाठी शासन पत्रान्वयेच्या अनुषंगाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नुकतेच परिपत्र प्रसिध्द केले आहे. या परिपत्रकाची प्रत दुय्यम निबंधक कार्यालयामधून नागरिकांना प्राप्त होईल.
त्यानुसार महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2015,कलम 8 ब मधील परंतुक मध्ये नमूद केलेप्रमाणे मंजूर केलेला पोटविभाग किंवा रेखांकन दस्तासोबत जाडून दस्त नोंदणी करता येईल. सदर कायद्यातील तरतुदी थोडक्यात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.
एखादया सर्वे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याचा सर्वे नंबर मधील तुम्ही एक दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल तर त्यांची नोंदणी होणार नाही. मात्र त्याच सर्वे नंबरचा ले-आउट करुन त्यामध्ये एक, दोन गुंठयाचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजूरी घेतली असेल तर अशा मान्‍य ले-आउट मधील एक दोन गुंठे जमीनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.
यापूर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी तुकडयांची खरेदी घेतली असेल अशा तुकडयाच्या खरेदी घेतली असेल अशा तुकडयाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा उक्त कायद्यातील कलम 8 ब नुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.
एखादया आलाहिदा निर्माण झालेल्या तुकडयाची शासन भुमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चीत होऊन / मोजनी होवून त्याचा स्वतंत्र हद्द निश्चीतीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल तर अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. अशा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकडयाच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू राहतील. जिल्हयातील नागरीकांनी स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना वरील सर्व बाबींची तंतोतंत पडताळणी करुन दस्त नोंदणीसाठी सादर करावे असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ध.ज.माईनकर यांनी केले आहे.

                                               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!