Spread the love

लातूर :- { प्रतिनिधी } दिनांक 28/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस अंमलदार राजाभाऊ मस्के, माधव बिल्लापटे,नितीन कठारे हे एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत गांधी चौक परिसरात फिरत होते. तेव्हा त्यांना रस्त्यावर एक बेवारस बॅग पडलेली दिसली. ती बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्या- चांदीचे दागिने व काही कागदपत्र दिसून आली. अंमलदारांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांना दिली.पोलीस अधिक्षक श्री निखिल पिंगळे यांच्या निर्देशांन्वये सदरच्या कागदपत्रांवरून बॅगच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा ती बॅग दादोजी कोंडदेव नगर, लातूर येथे राहणारे राजू प्रभाकर वेदपाठक यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यांना संपर्क साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आले. राजू वेदपाठक यांनी सांगितले की, आज सकाळी काही कामानिमित्त मी गंजगोलाई कडे गेलो होतो. माझ्या मोटार सायकलला लावलेली बॅग त्यामध्ये 04 जोडी सोन्याचे फुले, 06 चांदीचे करंडे, 09 चांदीची कमळे, जोडवे-बीचवे, वाळे आणि सोन्याचा चुरा असा 60 हजार रुपयाच्या चीजवस्तू असलेली बॅग रस्त्यात हरवली होती असे सांगितले.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे हस्ते सदरची बॅग मूळ मालक श्री.राजू वेदपाठक यांना परत देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे प्रामणिकपणा बद्द्ल वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!