लातूर : ( प्रतिनिधी) लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी चालू असल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. येत्या दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी खंडोबा गल्लीतील वीरशैव समाज सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न होणार आहे. मेळाव्याचे हे दहावे वर्ष असून मागच्या दहा वर्षात अशा प्रकारच्या माध्यमातून कोणताही मोबदला न आकारता सेवाभावी वृत्तीने हे समाजकार्य केले जात आहे. या मेळाव्याच्या आयोजनाविषयी माहिती देताना अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव पुढे म्हणाले की, लिंगायत समाज कायम सेवाभाव जोपासून चालणारा समाज आहे. वेगवेगळ्या संस्काराचे कार्यकिरम या समाजाच्या माध्यमातून सातत्याने आयोजित केले जातात. वीरशैव लिंगायत समाज विविध जातींचा समूह आहे. ‘ जात सोडा – पोटजात जोडा ‘ हे ब्रीद घेऊन दि. ३० ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून उप वर – वधू आपल्या पालकांसह मेळाव्यात सहभागी होणार आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीचाही मेळावा यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्वच पदाधिकारी परिश्रम घेत असल्याचे प्रा. होनराव यांनी सांगितले.
या मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत कोरे यांनी यावेळी बोलताना मेळाव्यानिमित्त बाहेरगावाहून येणाऱ्या सर्व वधू – वर व त्यांच्या पालकांची राहण्या – जेवण्याची व्यवस्था निःशुल्क करण्यात आल्याचे सांगितले. हा मेळावा राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या स्मरणार्थ घेण्यात येत आहे. मेळाव्याला अहमदपूरकर महाराज व हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्यासाठी आतापर्यंत ५०० वधू – वरांच्या नोंदी झाल्या असून मेळाव्याच्या दिवसापर्यंत हा आकडा किमान दोन हजारांच्याही पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळाव्यात नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार समितीच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही कोरे यांनी नमूद केले.
याप्रसंगी विश्वनाथप्पा निगुडगे, सिद्रामप्पा पोपडे, बंडप्पा जवळे, दगडूआप्पा मिटकरी, मेळाव्याचे कार्याध्यक्ष अभिषेक ( तम्मा ) चौंडा, स्वागताध्यक्ष कमलेश पाटणकर, कार्यवाह बालाजी पिंपळे , लक्ष्मीकांत मंठाळे, सुनील भिमपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
