
माजी मंत्री आ. निलंगेकरांचे युवा मेळाव्यात आवाहन
लातूर (प्रतिनिधी) – देशाच्या संस्कृती आणि धर्माला मोठी परंपरा आहे. मात्र या परंपरेला गालबोट लावण्याचे काम देशात कांही विघातक शक्तीच्या माध्यमातून होऊ लागलेले आहे. यामुळेच जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार देशासह राज्यात घडू लागले आहेत. हे लोण ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहचू लागलेले असून आता जबरदस्तीने धर्मांतराविरोधात केवळ निवेदने नको तर वॉर्निंग देऊन हे प्रकार हाणून पाडावेत असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहेत.
लातूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर युवकांशी संवाद साधताना बोलत होते. या मेळाव्यास खा. सुधाकर श्रृंगारे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, मनपाचे माजी गटनेता शैलेश गोजमगुंडे, माजी स्थायी समिती सभापती दिपक मठपती, शहर सरचिटणीस अॅड. दिग्विजय काथवटे, युवा मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य विवेकानंद उजळंबकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव अरुण पाठक, प्रेरणा होनराव, अमोल निडवदे, गणेश गोमचाळे, दत्ता चेवले, प्रदेश कार्यकारणी सदस्य रविशंकर केंद्रे यांच्यासह जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
संपुर्ण जगभरात हिंदू संस्कृतीला आणि धर्माला मोठी परंपरा लाभली असल्याचे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या संस्कृतीला आणि धर्मांच्या परंपरेला प्रतिष्ठा मिळवून देत त्याला जोपासण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. मात्र देशात कांही विघातक शक्तीच्या माध्यमातून भुलथापा आणि आमिष दाखवून जबदरस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार घडू लागलेले आहेत. हे प्रकार देशासह राज्याच्या विविध भागांमध्ये होत असून आता याचे लोण हळू हळू ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहचवू लागले असल्याची खंत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. जबरदस्तीने होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देण्याचे काम होत असले तरी या घटना कमी होत नाहीत त्यामुळेच आता केवळ निवेदन देऊन शांत बसण्याची वेळ नसून जबरदस्तीने धर्मांतर करणार्यांना वॉर्निंग देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. याकरीता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जबरदस्तीने होणारे धर्मांतराचे प्रकार हाणून पाडावेत असे आवाहन माजी मंत्री. आ. निलंगेकर यांनी यावेळी केले.
देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवा शक्तीने अधिक सक्रिय होऊन काम करण्याचे अपेक्षीत असल्याचे सांगत युवा पिढीने समाजकारणासोबत राजकारणातही काम करत असताना सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातलेल्या असून आगामी मनपाच्या निवडणूकीत 35 किंवा त्यापेक्षा कमी वयोगटात असणार्या तरुणांना 80 टक्के उमेदवारी देण्याची घोषणा माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केले. मात्र ही उमेदवारी मिळविण्यासाठी तरुणांनी केवळ नेत्यांच्या अवतीभोवती फिरण्याचे काम न करता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना लोकहिताच्या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी त्यांच्याशी जोडले जाऊन त्यांच्यासाठी काम करणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. आगामी निवडणुकामध्ये जिल्हा परिषदेसह मनपावरही भाजपाचा झेंडा युवा शक्तीच्या माध्यमातून फडकविण्यात येईल असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, खा. सुधाकर श्रृंगारे, प्रदेश कार्यकारीण सदस्य शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे आदींनी युवा मेळाव्यास संबोधीत केले. मेळाव्याचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले. मेळाव्याच्या सुरुवातीला भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील शहीद जवान श्रीधर चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मेळाव्यास शहरासह लातूर जिल्ह्याच्या विविध भागातील युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

